ब्लॉग संग्रहण

बुधवार, १ ऑगस्ट, २०१२

स्मरण लोकमान्य टिळकांचे

लोकमान्य टिळक यांच्या विचारांचे स्मरण होणे ही आजची खरी गरज आहे. स्वातंत्रपूर्व काळात लोकमान्यांच्या विचारांनी तत्कालिन लोकांतील ' जी हुजुरी 'वृत्ती कमी करून स्वाभिमान, स्वातंत्रप्रेम व धैर्य उत्पन्न केले. आपण ससे, कोल्हे, कुत्रे नसून 'सिंह' आहोत ही जाणीव लोकां निर्माण झाली. सद्या लोकमान्य टिळकांचे विचार तरुण पिढीस मार्गदर्शक ठरतील. लोकमान्य टिळक त्यांच्या जीवनातील संकट काळात अचल, स्थितप्रज्ञ व कार्यतत्पर राहिले. गीतेचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. संकटातही त्यांचे चित्तस्थिर होते. आत्म विश्वास, धैर्य, मित्रवात्सल्य, साधेपणा, स्वार्थ त्याग, विरक्ती, विवेक राष्ट्रभिमान आदी गुण वैशिष्ट्ये असलेले लोकमान्यांचे चरित्र अद्वितीय आहे. राजकारण्यानीही टिळकांच्या जीवनाचा अभ्यास करावा. संत सांगतात- जाणत्याचे जाणावे प्रसंग |जाणत्याचे घ्यावे रंग | जाणत्याचे स्फूर्तीचे तरंग | अभ्यासावे || इंग्रजांनी काळ्यापाण्याची जबर शिक्षा सुनावून तुरुंगात प्रवेश होताच कागद- पेन्सिल घेऊन रातोरात अपिलाचे मुद्दे स्वताच बिनतोड लिहून सूर्योदय होताच सरकार दरबारी सादर करणारे लोकमान्य टिळक किती धैर्यवान व स्थिरचित्त असतील याची कल्पना येते. संत म्हणतात, चीत्तक्षोभाचे अवसरी | उचलूनि धैर्याने चांग करी | धृति म्हणिजे अवसरी | तियेते गा || टिळकांच्या विचारातून त्यांचे चतुरस्त्र व्यक्तिमत्व प्रकट होते. आजही हे विचार आत्मविश्वास निर्माण करणारे, आशावादी असून व्यक्ती, समाज संस्कृति व राष्ट्रहितासाठी प्रेरक आहेत. टिळक केसरीतील एका लेखात म्हणतात- " आपल्या थोर पूर्वजास विसरून जाऊन कोणतेही राष्ट्र उदयास आले नाही व येणार नाही. असा जो ऐतिहासिक सिद्धांत आहे, त्याचेच 'शिवजयंती उत्सव ' हे दृश्य स्वरूप आहे. स्वभाषेची अभिवृद्धी स्वराष्ट्राच्या इतिहासाचा स्वकीय दृष्टीने अभ्यास, मनन व स्वधर्मश्रद्धा इ. गोष्टी राष्ट्राच्या उत्कर्षाला कारणीभूत होतात.त्यासाठी शिवजयंती उत्सवासारख्या उत्सवांची गरज आहे. महाराष्ट्रातील निरनिराळ्या जातीचे प्रेम एकाच ठिकाणी बसण्यासारखे जर कोणते स्थळ असेल तर ते श्री शिवछत्रपतींचे चरित्र हेच होय. समान शस्त्रे, लोकांची पूर्ण मदत, डोंगर व किल्ले आणि जंगल यांचा पूर्ण पाठींबा, इतकी सिद्धता असल्यावर गामिनी काव्याने स्वराज्य स्थापित येते ही गोष्ट हिंदुस्थानच्या इतिहासात श्रीशिवाजी महाराज यांच्या प्रथम लक्षात आली. धैर्याने, उमेदीने, उत्साहाने, निष्काम कर्माने राष्ट्राला जे तेज येते त्याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजेच श्री शिवाजी महाराजांचे चरित्र होय. मार्गातील अनेक अडचणी बाजूला सारून जो पुढे पाऊल टाकतो त्यालाच यश मिळते. अलीकडच्या तीरावर बसून जो नुसता संकल्प करतो त्याला यश मिळणार नाही. भित्र्या माणसास ज्याप्रमाणे अंधारात भुते नाचलेली दिसतात त्याचप्रमाणे निरुद्योगी व निरुत्साही माणसाच्या वाटेत अडचणींचे डोंगर नेहमी उभे असायचेच."

1 टिप्पणी: